आज दिनांक १६/७/२०२२ रोजी दुपारी ३.४० ते ५.४० या वेळेमध्ये नाम फाउंडेशनचे पदाधिकारी व वसुंधरा संजीवनी मंडळाचे संचालक मंडळ व सल्लागार यांची एकत्रित मिटींग श्री अगवण यांच्या ठाणे येथील औद्योगिक परिसरातील कार्यालयामध्ये झाली.
या मिटींगमध्ये सर्व संचालकांची वैयक्तिक अशी ओळख करून देण्यात आली त्यानंतर श्री गणेश थोरात यांनी आपल्याविषयी आणि नाम फाउंडेशन यांच्या कामकाजाविषयी बरीच माहिती आपल्यापर्यंत पोहोचवली.श्री गणेश थोरात हे सिव्हील इंजिनियर असून त्यांचा स्वतःविषयी बांधकामाचा व्यवसाय आहे.
त्यांचे बरोबर असलेले सहकारी श्री संग्राम हे सर्व मशिनरी पुरवितात. हे दोघेही गेल्या सहा वर्षापासून नाम फाउंडेशनच्या कामांमध्ये कार्यरत आहेत. दोघांचाही स्वभाव समाजसेवी काम करावे असा असल्यामुळे ते या फाउंडेशनशी संलग्न आहेत.
आपल्या कामाची पद्धत, विविध क्षेत्रातील अनुभवी व्यक्तींचा संच पाहून त्यांना खूपच समाधान वाटले. त्यांनी असे सांगितले की, नाम फाउंडेशनला आपल्याबरोबर काम करायला निश्चितच आनंद वाटेल. आपल्याकडील अनुभवी व्यक्तींमुळे काम योग्य आणि नियोजनबद्ध रीतीने होऊ शकतं हे त्यांच्या लक्षात आले आहे.
तसेच त्यांनी अशा सेवा निवृत्त आणि निस्पृह व्यक्तींची नितांत गरज असल्याचे आवर्जून सांगितले. श्री कारखानीस यांनी गेल्या सहा वर्षातील आपल्या कामांचा लेखाजोखा पीपीटीद्वारे सुंदररीत्या सादर केला. त्याला विशेष सहयोग अक्षय भोसले आणि डॉ. नैमेष तुंगारे यांनी केले होते. श्री संदीपजी अध्यापक यांनी भारतातील एका अभिनव प्रयोगाची माहिती देताना सांगितले की खेवारे येथे जो शाफ्ट टेक्नॉलॉजी वापरून प्रकल्प उभा केला आहे त्यामध्ये सरकारी मदतही चांगल्या प्रकारे मिळाली आहे.
शाफ्ट टेक्नॉलॉजी विषयी सांगताना त्यांनी असे सांगितले की या पद्धतीमध्ये उपलब्ध असलेल्या पाण्याचा साठा वितरीत करण्यासाठी मोठा टॅंक बांधायची गरज नसते. त्या ऐवजी एचडीपी पाईपचा उपयोग करून हेडमास्ट बनविला जातो. त्याला सौरऊर्जेने आतून एका पाईपद्वारे पाणी चढविले जाते व गुरुत्वाकर्षण पद्धतीने खाली आणून ते आपल्याला हव्या तेवढ्या ठिकाणी वळविले जाते.
पुढे सर्व माहिती श्री कारखानीस त्याचप्रमाणे आवश्यक त्यावेळी श्री भागवत काका व श्री मिलिंद केळकर यांनी त्यांना दिली. नाम फाउंडेशनच्या वतीने श्री थोरात यांनी विचारलेल्या सर्व प्रश्नांची आणि शंकांची समाधानकारक उत्तरे या सर्व व्यक्तींनी दिल्यामुळे त्यांना समाधान वाटले.
यातूनच त्यांनी असाही प्रश्न केला की आपण या दोन तालुक्यांव्यतिरिक्त काम करू शकतो का? अर्थातच हे दोन तालुके पथदर्शी बनवण्याच्या दृष्टीने या दोन तालुक्यांचा पाण्याचा प्रश्न आपण आधी सोडवणार आहोत. त्यामुळे इतर भागाचा आता आपण विचार केलेला नाही. परंतु भविष्यामध्ये वेळ आल्यावर आपण तिकडेही काम करणार तयार आहोत असे श्री भागवत तसेच श्री. केळकर यांनी श्री थोरात यांना सांगितले.
सौ कविता पडवळ यांनी रोटरीच्या माध्यमातून त्यांच्या शाळेसाठी जी मदत मिळवून दिलेली आहे, त्यामुळे त्या शाळेमध्ये आता नवीन प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या वाढली आहे. यापूर्वी या शाळेतील विद्यार्थी दुसऱ्या शाळेमध्ये प्रवेशासाठी नेले जात होते ते बंद झाले.
सौ कवितासारख्या एका सजग शिक्षिकेमुळे हे शक्य झाले. सौ कवितासारख्या एका सजग शिक्षिकेमुळे हे शक्य झाले तसेच गावाशी चांगला संपर्क असल्यामुळे तेथील कोणतेही प्रश्न त्या चांगल्या प्रकारे हाताळू शकतात असेही निदर्शनाला आले आहे.
तिने केलेल्या लेनाड तलावाच्या सर्व्हेमुळे त्या कामासाठी रोटरी इंटरनॅशनलने पैसे दिले आहेत.श्री विराज घरत हेही पहिल्यापासून संस्थेच्या कामांमध्ये असल्यामुळे मुरबाड परिसरातील ग्रामीण भागामध्ये संपर्क करण्यासाठी त्याचप्रमाणे तेथील ग्रामस्थांना भेटण्यासाठी एक चांगली व्यक्ती उपलब्ध झालेली आहे. श्री मिलिंद केळकर, श्री मुकुंद जोग व श्री विश्वजीत नामजोशी हे बंधारे, तलावाचा गाळ उपसा यासंबंधीच्या सर्व तांत्रिक बाबी आणि कार्यक्षेत्राची प्रत्यक्ष माहिती घेऊन तेथील प्रत्यक्ष रिपोर्ट सादर करतात.
त्यातूनच आपले काम पुढे जाते. श्री सुळे श्री नाईक श्री अजित जोशी हे अर्थविषयक कामांची पाहणी करतात.श्री जगदीश संधानशीव हे वेबसाईट व तत्संबंधीचे काम पाहतात. डॉ.नैमेष तुंगारे, श्री कारखानीस व भागवत काका हे सीएसआर संबंधी कार्यरत आहेत.श्री महेश भागवत श्री हिंगणे यांना मुख्यतः प्रशिक्षणासंबंधी काम करणे आवडते. श्री अरविंद देशमुख,ॲड्.श्री प्रशांत सावंत श्री नितीन पाटील यांचाही सहभाग कोणत्या ना कोणत्या कामांसाठी असतो. डॉक्टर श्री विलास सुरोशे व श्री दिगंबर विशे सर यांच्या ज्ञानाचा उपयोग शेती विषयक कामांसाठी केला जातो.
ग्रामीण भागातील कार्यकर्त्यांचे प्रबोधन करणे, गावकऱ्यांच्या गाठीभेटी करणे या कामांसाठी करावा लागणारा प्रवास यात श्री भागवत काकांचा मोठा वाटा असतो. त्याला सहाय्यभूत काम श्री आनंद राऊळ हे करीत असतात. याप्रसंगी श्री गणेश थोरात, श्री संग्राम व त्यांचे सहाय्यक तसेच श्री हेमंत भोईटे यांचा भेटवस्तू आणि शाल देऊन सत्कार करण्यात आला. श्री.अरविंद देशमुख यांनी आभार प्रदर्शन केले. एकत्रित फोटो काढून कार्यक्रम संपला.